Ad will apear here
Next
स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब


राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांनी स्त्री-शिक्षणविषयक, तसेच अन्य सामाजिक कार्यातून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
........
राजर्षी शाहूमहाराजांचे धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या पत्नी श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांचा जन्म सहा डिसेंबर १९०६ रोजी झाला. सासवडचे शंकरराव पांडुरंगराव जगताप यांच्या त्या कन्या. त्यांचे माहेरचे नाव जमना. त्यांचा विवाह सहा जून १९१७ रोजी राजपुत्र शिवाजी यांच्याशी झाला; पण दुर्दैवाने त्यांना वैवाहिक जीवन केवळ एक वर्ष लाभले. प्रिन्स शिवाजी १२ जून १९१८ रोजी शिकार करीत असता अपघाताने मृत्युमुखी पडले. प्रिन्स शिवाजी यांचे निधन झाल्यावर शाहू महाराजांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. 

त्यातून सावरून महाराजांनी आपल्या तरुण विधवा सुनेस आपल्या मुलीप्रमाणे वाढवले, शिक्षण दिले, संस्कार घडवले. एक सुसंस्कारित आदर्श स्त्री व स्वावलंबी, कणखर व्यक्ती म्हणून इंदुमतीदेवींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा म्हणून महाराजांनी जातीने प्रयत्न केले. आपण कोल्हापूरच्या बाहेर गेल्यावर मागे आपल्या सुनेने राजपरिवाराशी कसे वागावे याविषयी बारीकसारीक सूचना महाराज त्यांना देत असत. इंदुमती राणीसाहेब कोल्हापुरात राहत असताना महाराजांनी पुण्यावरून त्यांना एक पत्र लिहिले होते. 

त्या पत्रात सोनतळी कँपवर राहणाऱ्या मुलींच्या सोबत आपण कसे वागावे याचे त्यांनी आपल्या सुनेस मार्दर्शन केले होते. छत्रपती शाहू महाराज सांगत - आपण जेवतेवेळी सर्व मुलींना बरोबर घेऊन जेवत जावा. सर्व मुलींनी चहा घेतल्यानंतर आपण चहा घ्यावा. पंगतीला बसल्यानंतर सर्व मुलींचा समाचार घ्यावा. सर्व मुलींनी, नोकर लोकांनी तुमच्यावर प्रेम करावे, अशा रीतीने त्यांना वागवीत जावा. 

वाडवडिला सेवित जावे। 
सवतीशी प्रेम धरावे ।
पतिकोपी नम्र असावे।
सेवकावरी सदय पहावे।
निज धर्मा दक्ष राहावे।
भाग्य येता मत्त न व्हावे।
ऐशीलाची गृहिणी म्हणती।
इतरा कुलव्याधीच होती।

कण्व ॠषींनी आपल्या मुलीस असा उपदेश केला आहे. तो ध्यानात ठेवून वागत जावे. 

शाहूमहाराजांनी इंदुमती राणीसाहेबांना शिक्षण दिले आणि त्यांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावेत असेच प्रयत्न केले. महाराजांच्या निधनानंतरही इंदुमती राणीसाहेबांनी आपले शिक्षण चालू ठेवले. १९२५मध्ये त्या मॅट्रिक पास झाल्या. त्या काळात मॅट्रिक उत्तीर्ण होणाऱ्या त्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. दिल्लीच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळूनही त्यांना त्या शिक्षणाचा लाभ घेता आला नाही. 

इंदुमती राणीसाहेबांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केले. नाशिक येथे भरलेल्या मराठा महिला शिक्षण परिषदेच्या सहाव्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा होत्या. कोल्हापुरात त्यांनी ‘ललित विहार’ (१९५४) संस्था स्थापून स्त्री शिक्षण प्रसाराच्या कामाला आरंभ केला. स्त्री-मुक्तीची चळवळ गतिमान करण्यासाठी व कार्यकर्त्यांची बौद्धिक जडणघडण करण्यासाठीच त्यांनी ललिता विहारची स्थापना केली. मुलींना केवळ पुस्तकी शिक्षण न देता समर्थ गृहिणी बनविण्याचा हा महाराष्ट्रातील पहिला शैक्षणिक प्रयोग होता. मुलींना उद्यमशील बनविण्यासाठी त्यांनी औद्योगिक कला भवन सुरू केले. इंदुमती राणीसाहेब यांनी महिला वसतिगृह सुरू करून शहरात शिक्षण व नोकरीसाठी आलेल्या स्त्रियांच्या निवासाचा प्रश्न सोडवला. १९६१ साली त्यांनी मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स सुरू केले. 

स्त्रियांनी घराचा उंबरा ओलांडून बाहेर यावे व स्वतःबरोबर समाजाचेही प्रश्न सोडवावेत, हाच ललिता विहारचा उद्देश होता. महाराणी शांतादेवी गायकवाड प्रशिक्षण संस्था (१९५४), महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय (१९५५), कमी शिकलेल्या मुलांसाठी औद्योगिक कला भवन, मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स (१९६१) या संस्था त्यांनी काढल्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाची सोय केली. इंदुमतीदेवी कोल्हापूरच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाच्या एक अभिन्न घटक होत्या. त्यांनी समाजकार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती, गरजू विद्यार्थी वगैरेंना सढळ हाताने मदत केली. 

इंदुमती राणीसाहेब या धार्मिक वृत्तीच्या व परोपकारी स्वभावाच्या होत्या. त्यांना संगीत, नाट्य आणि तत्सम ललित कलांविषयी उत्तम अभिरुची होती. त्यांचे ग्रंथप्रेम आणि ज्ञानजिज्ञासा प्रसिद्ध आहे. त्यांचे स्वतःचे ग्रंथालय मराठी, संस्कृत, इंग्रजी आदी भाषांतील विविध विषयांतील ग्रंथांनी समृद्ध होते. 

शिक्षण, संस्कार, रसिकता आणि सौंदर्य अशा विविध गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त, आकर्षक व प्रभावी झाले होते. इंदुमती राणीसाहेब यांचे निधन ३० नोव्हेंबर १९७१ रोजी कोल्हापूर येथे झाले. 

आपल्या कार्यकर्तृत्वाने इंदुमती राणीसाहेब खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्नुषा शोभल्या. त्यांचे स्मरण आपल्याला कायम प्रेरणादायी ठरेल. त्यांना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा.

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KVTYCT
Similar Posts
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्माला आलेले संभाजीराजे हे कोल्हापूर राज्याचे दुसरे छत्रपती. २० डिसेंबर हा त्यांच्या स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयी...
दुसरे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (सातारा) साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांचा १४ ऑक्टोबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज १८ मे १६८२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्न झाले. हेच पुढे थोरले शाहू म्हणून इतिहासात अजरामर झाले. १५ डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
रावरंभा निंबाळकर फलटणचे बजाजी नाईक-निंबाळकर यांचे पुत्र महादजी यांचे पुत्र म्हणजे रावरंभा निंबाळकर. यांचा कार्यकाळ मोठा असून, इतिहासकालीन अनेक घटनांत त्यांचा मोठा वाटा आहे. २२ नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language